Wednesday 4 May 2016

From President's Desk - MBVA

MBVA President
जवाबदारी स्वीकारताना...
सभासद बंधूनो ,
नमस्कार. मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना (एम.बी.व्ही.ए.)च्या नव्या कार्यकारिणीकडे संघटनेचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्या अंतर्गंत, माझ्याकडे अध्यक्षपदाची जवाबदारी सोपविण्यात आली आहे. आपणा सर्वांनी दाखविलेल्या या विश्वासाबद्दल मी आपणा सर्वांचा अत्यंत ऋणी आहे आणि आपल्या स्नेह व विश्वासाचे प्रतीक म्हणून अध्यक्षपदाचा विनम्रपणे स्वीकार करु इच्छितो.
आपली मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना (एम.बी.व्ही.ए.) म्हणजे मराठी उद्योगक्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची, जबाबदारी आणि विश्वासार्ह संघटना म्हणून आज ओळखली जाते. श्री. एस.आर. कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून आणि जेमतेम काही जणांच्या एकत्रिकरणातून सुरु झालेली ही संघटना आज मराठी बांधकाम व्यावसायिकांसाठी एक दिशादर्शी चळवळ बनली आहे, हे सांगताना विशेष अभिमान वाटतो. या संघटनेच्या कार्यासाठी संधी मिळणे, ही जितकी आनंदाची तितकीच जबाबदारीची होय. मा. श्री. राजेंद्र पाटे व त्यानंतर मा. श्री. सुधीर दरोडे यांच्या कार्यकाळात संघटनेने उल्लेखनीय वाटचाल केली आहे. मराठी बांधकाम व्यावसायिकांना नवी दिशा देणारे विविध उपक्रम सुरु झाले. या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचेच कार्य नव्या काही संकल्पनांसह पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यासाठी आपणा सर्वांचे स्नेहाचे, विश्वासाचे आणि सहकार्याचे पाठबळ कायम राहावे, ही आग्रहाची विनंती.
सध्या आपल्या बांधकाम व्यवसायावर विविध प्रकारच्या आव्हानांचे सावट आहे. केवळ एकत्र येऊन नव्हे तर एकदिलाने काम करुनच त्यावर मात करता येऊ शकतेयाच भावनेतून विविध संकल्पनांची योजना आणि त्यांची उत्तम अमलबजावणी होऊ शकते, असे मला वाटते. व्यवसायात डोकावणाऱ्या नकारात्मकतेला दूर करुन त्यास सुप्रतिष्ठा मिळवून देणे, हे आपणा सर्वांचे महत्त्वाचे आणि आवश्यक कर्तव्य आहे. त्यासाठी तरुण सभासदांना सोबत घेऊन, सर्वांसाठी हितकारी असे विविध उपक्रम हाती घेण्याचा आमचा मानस आहे. अगदीच प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासदौऱ्यांच्या निमित्ताने ज्ञात झालेल्या संकल्पनांची आपल्याकडे अंमलबजावणी करता यावी, यासाठी संघटना विशेष प्रयत्न करु शकते. आपल्या व्यवसायाचे स्वरुप बघता सभासदांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहणे ही प्राधान्याची बाब ठरते. म्हणूनच, व्यक्तिमत्व विकासाबरोबरच आरोग्य संवर्धनासाठीचे उपक्रमही राबविण्यात येतील. विविध समाजोपयी उपक्रमांसाठी निधी मिळविणे, हे देखील एक आव्हान असते. त्यावरही मात करण्यासाठी काही संकल्पना विचाराधीन आहेत. आपल्या संघटनेतील सभासदांना तांत्रिक तसेच कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र विकसित करण्याचाही आमचा मानस आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन त्यातून विविध संकल्पना राबवून ग्राहकांशी विश्वासाचे नाते जोडता, फुलविता येईल.
अर्थात, हे सर्व करण्यासाठी वेळ ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. त्याच दृष्टिकोनातून, आठवड्यातून एक संपूर्ण दिवस संघटनेसाठी देण्याचा व त्यातून सर्व सभासद बांधवांच्या संपर्कात राहण्याचे मी ठरविले आहे. त्यासाठी आपणा सर्वांचे भक्कम पाठबळ हवे आहेच. आपल्या एम.बी.व्ही.ए.ला वैभवाचे, विश्वासाचे प्रतीक म्हणून पुढे आपण्यासाठी अविरत आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याचा वसा आम्ही हाती घेतला आहे.
हा संवाद आटोपता घेताना मनात डोकावणाऱ्या नेमक्या भावना व्यक्त करणारे कविवर्य बा.सी. मर्ढेकरांचे शब्द आठवतात-
धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे, वांकु दे बुद्धिस माझ्या, तप्त पोलादाप्रमाणे..
-  श्री. गजेंद्र पवार
(नवनिर्वाचित अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना)

Reference Link : http://mbva.in/presidentmsg.php

2 comments:

Note: only a member of this blog may post a comment.